एकदा टकिला प्यायचीय - भाग दोन

पहिल्या भागानंतर साधारण दीड पावणेदोन वर्षं गेली आहेत. पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. मुलीला आता अठरावं लागलंय. काॅलेजजीवन सुरू झालंय.

तिला दहावीची परीक्षा संपली त्या दिवशी आम्ही मोबाइल घेऊन दिला होता. ती गणित वगळता कोणत्याही क्लासला वगैरे जायची नाही दहावीत असतानाही, त्यामुळे मोबाइलची आवश्यकताच नव्हती. सर्व मित्रमैत्रिणींकडे मोबाइल होते, तरीही तिने आमची ही अट मान्य केली होती. तिचा मोबाइल नव्हता म्हणून आमच्या मोबाइलला हात लावण्याची ितला परवानगी नव्हती. घरातल्या लँडलाइनचा वापर ती मुक्तपणे करू शकत होती.

मग मोबाइल हातात आला. त्याच सुमारास मीही स्मार्टफोन घेतला होता. त्यामुळे व्हाॅट्सअॅपवर मीही होते. तिच्या जवळच्या मित्रमैत्रिणींकडे माझा नंबर होता. त्यांच्या ग्रूपमध्ये वाढदिवसाला सरप्राइज देण्याची पद्धत आहे. हे सरप्राइज देण्यासाठी आईशी संगनमत करावेच लागते म्हणून. दहावीत तिचे फेसबुकही बंद होते. तेही चालू झाले. तिच्या अनेक मित्रमैत्रिणींनी मला फ्रेंड िरक्वेस्ट पाठवली. बहुतेकांची मी स्वीकारली. त्यामुळे साधारणपणे ही मंडळी खुलेआम काय शेअर करतात, ते मला कळत असते. परंतु व्हाॅट्सअॅप व फेसबुक मेसेजेस यामार्फत काय चालते, ते मी पाहात नाही. या वयातली मुलंमुली प्रचंड प्रमाणात सेक्स्टिंग करतात, असं आम्हा मैत्रिणींच्या बोलण्यातनं कळत होतं. (रूपारेलमधला आमचा आठ जणींचा ग्रूप. पुढच्या पिढीत सात मुलीच आहेत. आम्ही एकमेकींशी ईमेल आणि व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून सतत संपर्कात असतो. दोनेक महिन्यांतून भेटतोसुद्धा. त्यामुळे गप्पांमध्ये मुली हा विषय असतोच. आमच्यातल्या दोघींना मूल नाही पण त्या काॅलेजात शिकवतात. त्यामुळे त्यांचे इनपुट्स आम्हा आयांसाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. एक वेगळाच दृष्टिकोन मिळतो त्यांच्या अनुभवांमधनं. दोघीजणी काउन्सेलर आहेत, त्यामुळे त्यांचाही दृष्टिकोन महत्त्वाचा असतो.) यावर काय करायचं, याचा माझा निर्णय अजून झालेला नाही. म्हणजे तिचा फोन पाहायचा की नाही, हे मला अजून कळत नाहीये. पाहिला तर मोठा धक्का बसेल आणि तो आपल्याला सहन होणार नाही, हा एक मुद्दा.

परंतु, या विषयावर आम्ही अनेकदा बोलत असतो, थेट नसले तरी अप्रत्यक्ष. तीच मला तिच्या ग्रूपमधल्या गोष्टी सांगत असते, त्यातूनही मला कळत असतेच. या वयात भारतीय मुलंमुलींनासुद्धा जीएफ वा बीएफ असतात, हे ऐकून माहीत होतंच, पण तिने जेव्हा तिच्या ग्रूपमधल्या दोघांचा किस्सा सांगितला तेव्हा त्यावर शिक्कामोर्तब झालं. जेव्हा सगळा ग्रूप एकत्र असतो, तेव्हाही हे दोघे केवळ एकमेकांसाठीच असत. इतरांशी त्यांचा काहीच संवाद नसे. ती हे पाहून एकदा इतकी चिडली, की तिने चक्क ब्लाॅग लिहिला त्यावर. PDA - public display of affection असं म्हणतात याला. (मी काहीतरी लिहीत जा, असं अनेकदा सांगूनही जे झालं नव्हतं, ते या दोघा प्रेमी जीवांमुळे सहजी झालं बघा. तिच्या ब्लाॅगची लिंक http://etherealsurrealreal.blogspot.in/)

तिचं मैत्रवर्तुळ बऱ्यापैकी मोठं आहे. म्हणजे मला अनेकदा हा/ही कोण, असं विचारावं लागतं. त्यावर उत्तर देताना कपाळावर इतक्या आठ्या पडतात, विचारायची सोय नाही. काही कळत नाही या अम्माला, हे भाव स्पष्ट दिसतात. दहावीपर्यंतचा शाळेतला ग्रूप अजूनतरी कायम आहे, मुख्यत्वे वाढदिवसांच्या निमित्ताने ते सगळे एकत्र येत असतात. एकमेकांच्या घरीही जात असतात, मुलींचं स्टेओव्हर तर पाचएक वर्षांपासनं चालू आहे. बहुतेक सगळे आईवडील या मुलांना ओळखतात. रस्त्यात, रेल्वे स्थानकावर कुठे भेटले तर आवर्जून बोलतातही. तिच्या या ग्रूपमध्ये मराठी मुलं एकदोघंच आहेत, गुजराथी, पंजाबी, तमिळ अधिक. (हा एक मला प्रचंड अावडणारा भाग. मला मराठी शाळेत शिकल्याने १६व्या वर्षापर्यंत फक्त मराठी मैत्र, काॅलेजात एकच कानडी मैत्रीण मिळाली. काॅलेजमध्ये एकही मित्र नाही मिळाला कारण त्या वेळी चांगले गुण मिळवणाऱ्या मुलग्यांनी कला शाखेत प्रवेश घेण्याची फारशी पद्धत नव्हती. तसे मुलगे होते वर्गात, पण मैत्री काही झाली नाही.) तिचं नवीन मैत्रही सर्वभाषक आहे. तिच्या बाबाच्या वर्गातली आॅलमोस्ट सगळीच मुलंमुली तिच्या फ्रेंडलिस्टमधली. म्हणजे वयाची अट नाही या मैत्रीला. एक समान धागा मला तिसतो, तो म्हणजे हॅरी पाॅटर. हे सगळे पाॅटरहेड्स आहेत. अशा विविधभाषक मैत्रांकडून अचानक कानडी किंवा गुजराथी शिकण्याची उर्मी येत असते तिला.

भेटल्यावर पहिल्यांदा मिठी आणि जाताना मिठी हा प्रकारही तसा काॅमन. मला त्यात वावगं वाटत नाही, मलाही खूप दिवसांनी भेटणाऱ्या मित्राला वा मैत्रिणीला अशी मिठी मारली कीच तो/ती भेटल्यासारखं वाटतं.

फेसबुकवर फक आॅफ, किंवा WTF वगैरे प्रयोग सर्रास होत असतात. ते मला फार खटकतात. मी अजूनही फक आॅफ असं कधीच म्हटलेलं नाही. त्यामुळे या वयातल्या मुलांनी ते असं वापरणं मला आवडत नाही, परंतु काही गोष्टी सहन करण्यातल्या असतात, त्यातली ही एक असं मला वाटतं.

सध्याची आमच्या वाद होण्यासारखी एकमेव गोष्ट म्हणजे मोबाइलचा अतिवापर. उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सतत फोन समोर असतो. इतकं सारखं एकमेकांना सांगण्याजोगं काय असतं, असं मला वाटतं. माझेही चारपाच ग्रूप आहेत, त्यावर कधीतरी सगळ्या मिळून काहीतरी चावटपणा सुरू असतो. परंतु, सतत व्हाॅट्सअॅपवर मला काहीतरी उपाय शोधायचाच आहे. वायफाय बंद करणं, हा उपाय नाही कारण त्यामुळे मलाही ते वापरता येणार नाही. आणि इंटरनेट पॅक अाहेच तिचा अतिशय स्वस्त असा. स्वनियंत्रण किंवा अमुक एका वेळेतच ते वापरणं हा मार्ग दिसतोय. विशेषकरून आता बारावीची परीक्षा जवळ आलीय. तिला दुसऱ्या काॅलेजात प्रवेश हवा अाहे, तो मिळण्यासाठी उत्तम गुण आवश्यक आहेत. अशाच प्रकारे फोन चालू राहिला तर अभ्यासात लक्ष लागणं अशक्य आहे. हे शांतपणे कसं समजावता येईल आणि ते गळी कसं उतरेल, याच विचारात मी सध्या आहे. तिचं तिलाच हे पटून तिने काहीतरी अॅक्शन घेणं हा सगळ्यात चांगला उपाय आहे. पण तो कसा अमलात यायचा?
पहिला भाग http://mrinmayeeranade.blogspot.in/2014/10/blog-post_3.html

Comments

  1. अहो, आपण आणि आपल्या मुली या अगदी twinnies आहेत हो! मला आरशात बघतेय मी असंच वाटतंय! माझी मुलगी आता आठवीमध्ये आहे. रोज थोड्या फार फरकाने हे आणि असे अनुभव मलाही येत असतात. पण आता हळूहळू तिचं विश्र्व बदलतंय.. मला एक भिती किंवा हुरहूर वाटत राहते की ती माझ्यापासुन लांब चालली आहे.. i know की हा possessiveness आहे आणि it won't do me or her any good... आणि मग बरेच वेळा याच कारणामुळे आमच्यात खटके उडत असतात. या "teenager" मुलांशी कसं, किती आणि काय बोलावं हे खूप मोठं कोडं आहे! हे लगेच hurt होतात, "you dont know/ you won't understand" हे तर दिवसातून य वेळा ऐकावं लागतं! पण रडायला खांदा आईचा, कुणाचा राग काढायचा असेल तर आईकडे, हट्ट आईकडे, पण मग आईचा mood‌ down आहे, किंवा एखादी गोष्ट आईला आवडते म्हणून proactively करणे हे का नाही सुचत/ दिसत यांना? हि पिढी practical होण्याच्या नादात कोरडी होत चालली आहे का?

    ReplyDelete
    Replies
    1. लांब जातातच मुलं या काळात, आणि कोरडीही होतात. आपण जमेल तसं सुधारण्याचा प्रयत्न करत राहायचं. इतकी सविस्तर प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद

      Delete

Post a Comment